Ad will apear here
Next
मधुमेह कसा होतो?
 मधुमेह अर्थात डायबेटीस हे अलीकडे आबालवृद्धांच्या काळजीचे कारण झाले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण मधुमेह झालेले अगदी कमी वयाचे रुग्णही आता सहज आढळू लागले आहेत. डायबेटीस कसा टाळायचा, तो का होतो, तो झाला तर काय करायचे, अशा विविध गोष्टींवर डॉ. कैलास कमोद यांनी ‘गुडबाय डायबेटीस’ या पुस्तकातून सविस्तर मार्गदर्शन केले आहे. मधुमेहाबद्दल जनजागृतीसाठी १४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने, डॉ. कमोद यांच्या पुस्तकातील ‘मधुमेह कसा होतो’ हे प्रकरण येथे प्रसिद्ध करत आहोत. 
........
माणसाला काम करण्यासाठी, तसेच काम करत नसतानाही हृदयाची स्पंदने, श्वसनक्रिया, मेंदूचे कार्य इत्यादी नैसर्गिक शरीरक्रियांसाठी ऊर्जेची आवश्यकता असते. शरीरास आवश्यक असणारी ही ऊर्जा आपणास अन्नातील पिष्टमय पदार्थ (काबोहायड्रेट्स) या घटकापासून मुख्यत: मिळते. पिष्टमय हा घटक आपणास साखर, भात, बटाटे, पोळी, भाकरी, फळे इत्यादींद्वारे मिळत असतो. पिष्टमय पदार्थांचे शरीरात रक्तशर्करेत रूपांतर होते. रक्तशर्करा शरीराकडून ऊर्जा (एनर्जी) म्हणून वापरली जाते. ही रक्तशर्करा रक्तप्रवाहाबरोबर शरीरात पसरून शरीराच्या प्रत्येक पेशीस ऊर्जा म्हणून मिळत असते. 
शरीरपेशी या ऊर्जेचा वापर करून घेतात व शरीराकडून विविध हालचालींचे कार्य करून घेतात. 

मोटारगाडीस जशी ऊर्जा म्हणून पेट्रोलची आवश्यकता असते, तशीच पेशींना ऊर्जा म्हणून रक्तशर्करेची आवश्यकता असते. मोटारगाडी सुरू करण्यासाठी जशी ‘इग्रिशन की’ची आवश्यकता असते, म्हणजेच पेट्रोल या ऊर्जेचा संबंध इंजिनाशी जोडण्यासाठी चावी द्यावी लागते, त्याप्रमाणेच शरीरपेशींना शर्करा या ऊर्जेचा संबंध जोडण्यासाठी एका चावीची आवश्यकता असते. ही चावी म्हणजे ‘इन्सुलिन’ नामक एक द्राव होय. हे ‘इन्सुलिन’ पोटातील स्वादुपिंडनामक एका ग्रंथीतील बीटा पेशींकडून तयार होते. ते एक हार्मोन असल्यामुळे रक्ताद्वारे परस्पर पेशींना मिळते. त्यामुळे पेशींना ऊर्जेचा वापर करता येतो व अशा रीतीने शरीर कार्यक्षम बनते. 

मधुमेही व्यक्तींची स्वादुपिंडे ऊर्जेच्या वापरासाठी आवश्यक असणारे हे इन्सुलिन पुरेशा प्रमाणात तयार करण्यास काही कारणामुळे असमर्थ असतात. त्यामुळे रक्तशर्करा पेशीत प्रवेश करू शकत नाही. पेशीत प्रवेश बंद झाल्यामुळे रक्तवाहिन्यांतील प्रवाहाबरोबर येणारी शर्करा रक्तातच साठू लागते. परिणामी रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढू लागते. माणूस उपाशी असताना सामान्यतः शंभर मिलिलिटर रक्तात ७० ते १०० एमजी % रक्तशर्करा असणे हे वाजवी प्रमाण होय. अन्नसेवनानंतर हे प्रमाण १६० एमजी %पर्यंत पोहोचते व दोन तासांनंतर ते पुन्हा १२० एमजी % पर्यंत येते. रक्तशर्करेचे यापेक्षाही अधिक वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी ती मूत्राद्वारे बाहेर टाकण्याचा प्रयत्न शरीर करू लागते, तेव्हा मूत्राद्वारे शर्करा काही प्रमाणात बाहेर पडू लागते. 

शरीर जरी शर्करा बाहेर टाकण्याचा प्रयत्न करीत असले, तरी ते संपूर्णतः यशस्वी होत नाही व रक्तात वाढलेले शर्कराप्रमाण कायम राहते किंवा वाढत जाते. या स्थितीसच मधुमेह (डायबेटीस) म्हणतात. 

ऊर्जेच्या वापरासाठी आवश्यक असणारे इन्सुलिन पुरेशा प्रमाणात तयार करण्यास स्वादुपिंडे असमर्थ असण्याचे महत्वाचे कारण म्हणजे शरीरातील पेशींमध्ये निर्माण झालेला ‘इन्सुलिन रेझिस्टन्स.’ म्हणजे जे काही इन्सुलिन निर्माण होते त्याला पेशी दाद देत नाहीत. इन्सुलिनप्रती पेशी असंवेदनशील होतात. 

परिणामी थोड्या प्रमाणातील इन्सुलिनमध्ये जी क्रिया घडणार होती, ती घडण्यासाठी अधिक इन्सुलिनची गरज भासते आणि स्वादुपिंडातील बीटा पेशी जास्त इन्सुलिन निर्मिती करू लागतात. हे करण्यासाठी बीटा पेशीवर मोठा ताण येतो. या ताणाचा परिणाम म्हणून त्या लवकर थकतात आणि त्यांची इन्सुलिन निर्मितीची क्षमता कमी होते. त्यामुळे हळूहळू इन्सुलिनचा अभाव शरीरात निर्माण होतो; या स्थितीला ‘प्रीडायबेटिक स्टेज ‘(डायबेटिसपूर्व अवस्था) असे संबोधले जाते. मधुमेह लक्षात येण्याच्या आधीची काही वर्षे ही अवस्था अस्तित्वात असते. 

मधुमेह कोणाला होऊ शकतो?
मधुमेह कोणालाही होऊ शकतो. ज्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना मधुमेह आहे, अशी व्यक्ती आणि तिच्या कुटुंबातील इतर व्यक्तींना मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. तथापि, कुटुंबात इतिहास नसलेल्या व्यक्तीलाही मधुमेह होऊ शकतो. 

मधुमेह हा फक्त प्रौढांनाच होतो असा सार्वत्रिक समज आहे. परंतु तो चुकीचा आहे. मधुमेह व्यक्तीला वयाच्या कोणत्याही वर्षी अगदी जन्मतःसुद्धा गाठू शकतो. तथापि लहान मुलांमध्ये त्याचे प्रमाण कमी आहे इतकेच. साधारण ७० टक्के मधुमेही हे वयाची चाळिशी ओलांडलेले असतात. जगभरात लहान मुलांमध्येही टाइप-टू (इन्सुलिनवर अवलंबून नसलेल्या) मधुमेहाचे प्रमाण तुलनेने वाढू लागले आहे. रेडिमेड कॅलरीयुक्त जंकफूड आणि त्यामुळे येणारा लठ्ठपणा यांचा हा परिणाम आहे. 
मधुमेह लिंगभेद, जातिभेद अथवा भौगोलिक सीमा जाणत नाही. तो पुरुष अगर स्त्री कोणासही होऊ शकतो. वस्तुस्थिती अशी आहे, की जगामध्ये तो पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो; पण भारतात मात्र पुरुषांमध्ये त्याचे प्रमाण जास्त आढळते. याचे कारण भारतातील सामाजिक स्थितीमध्ये असावे. 

आपल्या देशात पुरुषांची एकूण संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे. शिवाय स्त्रियांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, त्यांचे अज्ञान यामुळे वेळेवर तपासण्या न होऊन मधुमेहाचे निदान खूप उशिरा होते किंवा होतच नाही. स्त्रियादेखील स्वत:च्या आरोग्याबाबत उदासीन असतात. मधुमेहाच्या भारतातील पुरुषबाहुल्याची अशी कारणे असावीत. 

मधुमेह होण्यास व्यक्तीचा आहारविहारसुद्धा कारणीभूत आहे. पूर्वी असे समजले जात असे, की फक्त चरबीयुक्त आहारच घातक असतो; पण अलीकडे असे लक्षात आले आहे, की जास्त गोड खाणे हेही मधुमेहाचे कारण ठरू शकते. साखरेचे ग्लुकोज, फ्रक्टोज, सुक्रोज इत्यादी जे प्रकार आहेत, त्यापैकी ग्लुकोज या प्रकारातील साखर खाण्यात अधिक प्रमाणात व सतत येत असेल तर ते मधुमेहाला आमंत्रण ठरू शकते. 

बैठ्या स्वरूपातील कामे करणाऱ्या लोकांमध्ये मधुमेह जास्त आढळतो. शरीराची दिवसभरात हालचाल न होणे किंवा अत्यल्प हालचाल होणे हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे. कमी श्रम करणाऱ्या व्यक्तींना तो अतिपोषणामुळे होऊ शकतो. लठ्ठ व्यक्तींमध्ये मधुमेहाचे प्रमाण अधिक आढळते. परंतु सडपातळ व्यक्तींसही मधुमेह होऊ शकतो. हा श्रीमंतांचाच आजार आहे असाही एक समज आहे; मात्र श्रमजीवी लोकांमध्येही हा आजार आढळतो. 

श्रमजीवी व्यक्तींना तो कुपोषणामुळे होऊ शकतो. शिवाय श्रमजीवी माणसे घेत असलेल्या आहारामध्ये प्रथिने खूप कमी प्रमाणात आणि कार्बोहायड्रेट्स अधिक प्रमाणात असतात. प्रथिनांपेक्षा पिष्टमय पदार्थ किमतीने स्वस्त असतात हे त्यामागचे कारण असू शकेल. श्रमजीवी लोकांत तो कमी प्रमाणात आढळतो. परंतु श्रमजीवी माणसांमध्ये त्याबद्दल जागृती नसते. अज्ञानामुळे किंवा आर्थिक कारणांमुळे ते तपासणी टाळतात. 
 
मधुमेहाची लक्षणे :
काहीही त्रास होत नाही किंवा कोणतेही लक्षण आढळले नाही तरीही मधुमेह आहे अशा लोकांचे प्रमाण आता खूप वाढले आहे. नियमित आरोग्य तपासणी, मधुमेह तपासणी शिबिरे किंवा विम्यासाठी तपासणी अशाप्रसंगी केवळ अपघाताने तो लक्षात घेतो असेही बरेचदा घडते. 

मधुमेहाच्या प्रमुख लक्षणांचा विचार करता अचानक वजन कमी होत असल्याचे लक्षात येणे, वारंवार मूत्रप्रवृत्ती होणे, जास्त लहान लागणे, अतिशय भूक लागणे, कमालीचा थकवा वाटणे, हाता-पायाला मुंग्या येणे, हातपाय बधीर होणे, शरीराला आणि जननेंद्रियाला कंड सुटणे, जननेंद्रियांवर आपोआप जखमा होणे, त्वचेवर पुळ्या, फोड किंवा गळू येणे, शरीरावरील जखम लवकर बरी न होणे, दृष्टी अधू होणे, रोज मलबद्धतेचा त्रास होणे, नपुंसकत्व होणे अशा लक्षणांपैकी काही वा एखाद-दुसरे लक्षण प्रामुख्याने आढळते. रुग्ण बेशुद्धावस्थेत सापडणे, वारंवार गर्भपात होणे, जास्त वजनाची मुले जन्मणे, क्षयरोग लवकर काबूत न येणे व इतर काही असंबद्ध आजार होणे ही मधुमेहाची कमी प्रमाणात आढळणारी लक्षणे आहेत. क्वचितप्रसंगी रुग्ण न्यूनशर्करावस्थेत (हायपोग्लायसिमिया) आढळणे, हे लक्षण सापडते. 

(डॉ. कैलास कमोद यांचे ‘गुडबाय डायबेटीस’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PVZZCS
Similar Posts
मधुमेह कसा होतो? मधुमेह अर्थात डायबेटीस हे अलीकडे आबालवृद्धांच्या काळजीचे कारण झाले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण मधुमेह झालेले अगदी कमी वयाचे रुग्णही आता सहज आढळू लागले आहेत. डायबेटीस कसा टाळायचा, तो का होतो, तो झाला तर काय करायचे, अशा विविध गोष्टींवर डॉ. कैलास कमोद यांनी ‘गुडबाय डायबेटीस’ या पुस्तकातून सविस्तर मार्गदर्शन केले आहे
स्वास्थ सूक्ते - आरोग्य म्हणजेच धन वैद्य जयंत देवपुजारी यांनी ‘स्वास्थ्य सूक्ते’ या पुस्तकात निरोगी जीवनासाठी आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विस्तृत विवेचन केले आहे. त्यातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.
‘हिपॅटायटिस बी’वरील प्रभावी आयुर्वेदीय उपचार काविळीत आढळणारी डोळे, नखे, त्वचा, लघवी पिवळी होणे ही लक्षणे नसतानासुद्धा कावीळ होऊ शकते. या प्रकारची कावीळ हिपॅटायटिस ‘बी’ या विषाणूंच्या संसर्गामुळे होते. काही लोक या प्रकाराला ‘पांढरी कावीळ’ असेही म्हणतात. आयुर्वेदीय उपचारांनी हा आजार बरा होऊ शकतो. ‘आरोग्यासाठी आयुर्वेद’ या आयुर्वेल प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकात आयुर्वेदाचार्य सुनील बी
प्राणायाम शिकताय? मग हे नक्की वाचा! डॉ. गिरीधर करजगावकर यांनी ‘प्राणायाम – ज्ञान व विज्ञान’ हे प्राणायामाबद्दल सखोल माहिती देणारे पुस्तक लिहिले आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हा अष्टांग मार्ग आहे. प्राणायामाचे ज्ञान मिळवत असताना या अष्टांग मार्गाचे मूलभूत ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. त्यापैकी ‘यम’ या मार्गाची

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language